Aanapurna
 

 

 . . श्रीवासुदेवानन्दसरस्वतीमहाराजकृत श्री वासुदेवमनन

(प्राकृत वेदान्तसार)

(ह्या ग्रन्थाच्या द्वितीयावृत्तीचे {इ. स. १९७०} प. पू. श्रीगुळवणीमहाराज यांनी लिहिलेले निवेदन येथे देत आहोत. ग्रंथ आपल्या संगणकावर उतरून घेण्यासाठी लॉगिन् करून डाउनलोड पृष्ठावर जावे.

 

सत्यं नमननरह सचछक्त्यरणपरम।। वन िपम दत तमतियम।।१।। 

 

श्रीमत्परमहंस परिव्रजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती स्वामी महाराजांचे ग्रंथ पंधरा वर्षांपूर्वी प्रकाशित झाले. त्या ग्रंथमालेतील तृतीय पुष्पांत आलेले प्राकृतमनन आज प्रकाशित करण्याचा योग येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. लघुवासुदेवमनन नावाचा संस्कृत ग्रंथ, पूर्वी मुद्रित झालेला आहे. संस्कृत भाषेचे ज्ञान नसणाऱ्या जिज्ञासू मंजळींनाही वेदान्तसिद्धान्त अनायासाने समजावेत या उद्देशाने हे प्राकृतमनन श्रीमहाराजांनी केलेले असावे. या ग्रंथांत मोक्षाचा उपाय, अध्यारोप, माया, अविद्या, जीव, ईश्वर, स्थूलसृष्टि, सूक्ष्मसृष्टि, अपवाद, अनुबन्धचतुष्ट्य, आत्मनित्यत्व, चतुर्विधमुक्ति, कर्मविचार, कर्तृत्वविचार, कारयिर्तृत्वविचार, अन्तर्यामिविचार, आत्मविचार, सूक्ष्मशरीरविचार, त्रिपुटीविचार, श्रुतितात्पर्यनिर्णय, अद्वैतसिद्धि, द्वैतनिषेध, इत्यादि अनेक महत्त्वाचे विषय आलेले आहेत. ब्रह्मज्ञानी महात्म्याचे हे विवरण असल्याने ते निःसंदिग्ध यथार्थ बोध करून देणारे आहे. वेदान्तविचार कसा असावा याचे मार्गदर्शनही या ग्रंथावरून होणारे आहे. हा ग्रंथ लहान आहे. पण शास्त्रमर्मप्रकाशक अशी ही संतांची वाणी आहे हे याचे वैशिष्ट्य आहे. अशा शास्त्रीय ग्रंथाचे श्रवण, मनन आस्थापूर्वक अधिकारी व्यक्तींनीं करीत राहून, खरा शांतीचा मार्ग मिळवावा हीच इच्छा हा ग्रंथ प्रकाशित करताना मंडळाने बाळगली आहे. ती प्रभुकृपेने पूर्ण होऊन, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखमाप्नुयात् ही स्थिती सर्वत्र प्रकट होवो हीच भगवंताजवळ प्रार्थना आहे.

आषाढ शु।। १, शनिवार, शके १८९२. दि. ४-७-७०

वा. द. गुळवणी

गुरु-शिष्य-संवाद

श्रीमहाराजांचे एकनिष्ठ प्रिय शिष्य श्री. प. प. नृसिंहसरस्वती दीक्षितस्वामीमहाराज. शेवटी त्यांचाच गुरुशिष्यसंवाद दिलेला आहे. श्रीभगवंतांनी अर्जुनाला ज्ञानप्राप्तीचे तद्धिद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया या श्लोकांत तीन उपाय सांगितले आहेत. त्यापैकी परिप्रश्न म्हणजे संतांच्या जवळ वेदान्तादि निःसंदिग्ध विषयावर चर्चा करणे. त्याची थोडक्यांत हकीकत अशी समजते की श्रीदीक्षितमहाराज नरसोबावाडीहून तीर्थयात्रा करण्याकरीता निघाले असता त्यांचा मुक्काम सांगलीस ज्यावेळी झाला, त्यावेळी अनेक जिज्ञासू मंडळींनी येऊन जे प्रश्न विचारले व त्यांची उत्तरे जी महाराजांनी दिली ती प्रश्नोत्तरे संकलित करून लिहिलेला असा हा ग्रंथ आहे.

श्रीदत्तजयंती १८७४, सोमवार

वा. द. गुळवणी




  Top