Nrusinhwatiks

कुमारशिक्षा 

डॉ. रा. ल. जोशी

निवृत्त प्राध्यापक संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर 

हाती घेतलेला ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा यासाठी वेदानुसारी ग्रंथकार मङ्गलश्लोक लिहितात. या परंपरेनें स्वामीमहाराजांनी पहिल्या श्लोकात श्रीदत्तात्रेयांना वंदन केले आहे. केवळ वंदनात्मक असलेल्या श्लोकातूनसुद्धा जो अर्थ सूचित होतो, तो अपेक्षितच आहे, एवढेच नव्हे तर दत्तसंप्रदायाच्या प्रत्येक जागृत साधकाला तो माहीत असणे आवश्यक आहे; एवढे याचे महत्त्व आहे. आपण ज्यांना दत्तात्रेय किंवा दत्तमहाराज म्हणून संबोधतो ते म्हणजे प्रत्यक्ष जगताच्या उत्पत्ति-स्थिति-लयाचे अंतिम कारण असणारे परमात्म तत्त्वच होय. ते अतिसूक्ष्म, म्हणूनच अतीन्द्रिय आहे. कुंभार हा घटाचे निमित्त-कारण असून माती ही उपादान कारण आहे. परमात्म तत्त्व हे जगताचे निमित्त कारण व उपादान कारण असे दोन्ही प्रकारचे कारण आहे. मातीत जसा बदल घडतो तसा या परमात्म तत्त्वांत बदल घडत नाही. म्हणजेच ते निर्विकार असूनही उपादान कारण असणे हे फक्त विवर्तवादातच संभवते. सर्वव्यापकाला कारणत्व हे सुद्धा विवर्तवादांतच होऊ शकते. त्या परमतत्त्वाने मायेच्या आश्रयाने निरनिराळे अवतार घेतले. त्यातील एक अवतार दत्तात्रेयांचा होय. सत्य-ज्ञान-अनंत हेच स्वरूप दत्तात्रेयांचे म्हणजेच परमात्म्याचे असून तेच वस्तुतः जीवाचेही स्वरूप होय. हा वेदान्ताचा अपूर्व म्हणजे इतरत्र कोठेही न आढळणारा सिद्धांत बालवयापासून मनावर बिंबविण्यासाठी, (कौमार आचरेत् प्राज्ञः धर्मान् भागवतानिह। = भागवत धर्माचे आचरण बाल्यावस्थेतच केले पाहिजे. भागवत ७::१) ही कुमार शिक्षा दयार्द्र बुद्धीने श्रीस्वामीमहाराजांनी लिहिली आहे. या शिक्षेतील चिंतनाने स्वस्वरूप मिळविण्याचा प्रयत्न निदान त्यासाठी प्रारंभ प्रत्येकाने करून कृतकृत्य व्हावे एवढीच वाजवी अपेक्षा श्रीस्वामीमहाराजांची असणार. कुमार शिक्षा केवळ बालांनाच नव्हे, तर बालवयात तसे संस्कार न झालेल्या सर्वांनाच उपयोगी पडणार आहे.

`या परमेश्वराचे अस्तित्व कोणीही नाकारू शकत नाही. त्याचे वर्णन परम आप्त असलेल्या वेदांनीच केलेले आहे. वेद हे अपौरूषेय आहेत, म्हणजे कोणीही जाणीवपूर्वक ते उत्पन्न केलेले नाहीत. या वेदांवर नितान्त श्रद्धा असणे आवश्यक आहे. त्या वेदांचे अनुसरण करणारी निरनिराळी शास्त्रे हीही प्रमाणभूतच आहेत. त्यांना स्मृति ग्रंथ म्हणतात. वेदांना श्रुति म्हटले जाते. श्रुति व स्मृति ह्या माणसाच्या दोन डोळ्यांप्रमाणे आहेत. सर्व ज्ञान प्राप्त करून घेण्याचे साधन म्हणजेच श्रुति व स्मृति. या श्रुति-स्मृतींनी मनुष्याला सत्कर्माकडे प्रवृत्त व असत्कर्मापासून निवृत्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच श्रुति-स्मृतींचा अभ्यास यावच्छक्य सद्गुरुंच्याकडून करणे आवश्यक आहे. हे अध्ययन करीत असता तर्कांचा अवलंब करणे जरूरीचे आहे. परंतु तो शुष्क तर्क नसावा. वेदानुकूल असाच तर्क असावा. केवळ आपल्या बुद्धीने वेदमंत्रांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नये. प्रकरण, इतर वेदान्त वाक्ये व वेदानुकूलतेच्या साहाय्याने मंत्रांचा अर्थ लावावा. अशा प्रकारची कर्मे करीत असताना अनेक संशय उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी जाणकार, सदाचार-संपन्न ब्राह्मणांना विचारून संशयाचे निरसन करून घेणे आवश्यक आहे. स्वामीमहाराज हे वेदोक्त कर्ममार्गाविषयी अत्यन्त आस्था बाळगणारे होते. लोकांची पळवाट काढण्याची वृत्तिही त्यांना ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी असा स्पष्ट अभिप्राय दिला आहे की, संकटकालीच फक्त गौण मार्गाचा अवलंब केला पाहिजे.  

संकटकाल नसताना आद्य कल्पाने म्हणजे मुख्य प्रकाराने, म्हणजे जसे सांगितले आहे, तसेच कर्म केले पाहिजे. अशा प्रकारे ईश्वरार्पणबुद्धीने जर धर्मानुष्ठान केले तर पाप नाहीसे होते, म्हणजेच चित्तशुद्धी होते. ज्या चित्तशुद्धीची सर्वत्र वेदान्तात अपरिहार्यता वर्णन केली आहे, ती चित्तशुद्धी कशी होते हे स्वामीमहाराजांनी सहजपणे सांगून त्याद्वारा ब्रह्मज्ञान मोक्ष प्राप्त होत असल्याचे सांगितले आहे. असे संपूर्ण शास्त्रसिद्धान्त तात्पर्यरूपाने प्रतिपादन करण्याचे महाराजांचे कौशल्य हे असामान्य आहे. ईश्वरार्पणबुद्धीने कर्तृत्वाभिमान उत्पन्न होत नाही व त्यामुळे जन्म-मरण परंपरेला कारण ठरणारी वासनाच निर्माण होत नाही. याचाच अर्थ, कर्म हे बंधनकारक होत नाही. अशाप्रकारे संपूर्ण गीतेचे सार या ठिकाणी आले आहे. अशा प्रकारची कर्मे फलाची अभिलाषा सोडून केल्यास मुमुक्षुत्व मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा उत्पन्न होते. वेद अध्ययनाने ऋषिऋण, यज्ञयागादिकांनी देवऋण व संतति निर्माण करून पितृऋण अशा तीन ऋणांतून मुक्त झाल्यानंतर जर कोणी कर्म सोडून मोक्षमार्गाला गेला, तर त्याला कोणतेही विघ्न उत्पन्न होत नाही. कर्म मुळीच न करणे किंवा कर्म हेच शेवटपर्यंत आत्यंतिक कल्याणाला कारण होते असे मानणे, हे दोन्ही प्रकार चुकीचे आहेत. प्रथम कर्म करणे हेही आवश्यक व नंतर ते सोडणे हेही आवश्यक (त्यजत्येव हि तज्ज्ञेयम्) चित्तशुद्धीपर्यंत कर्म केलेच पाहिजे. दीर्घकालापर्यंत कर्म करूनही शम-शमादिक उत्पन्न झाले नाहीत, म्हणजेच चित्तशुद्धी झाली नाही, तरीही मरेपर्यंत कर्मे करावीतच. त्यांची फले पुढल्या जन्मी मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. या जन्मात आवश्यक ती कर्मे न करताच चित्तशुद्धी झालेला एखादा मनुष्य दिसून येतो. त्याने पूर्वजन्मी तशी कर्मे केली असली पाहिजेत, हे अनुमान करण्यास काहीही हरकत नाही. कारण, कारणाशिवाय कार्य घडूच शकत नाही व (नाभुक्तं क्षीयते कर्म देवीभागवत) केलेल्या कर्माचे फळ (चांगले किंवा वाईट) उपभोगावेच लागते, या सिद्धान्ताप्रमाणे या जन्मी उपभोग न घेतलेल्या कर्माचे फल पुढच्या जन्मी प्राप्त होतच असते. भारतीयांचा हा कर्मसिद्धान्त अनन्यसाधारण आहे. त्याचे मर्म बाल्यावस्थेपासूनच जाणून घेतले पाहिजे अशी स्वामीमहाराजांची अपेक्षा आहे. साधकाने हे सर्व जाणून अत्यंत दक्षतेने अनाचार व अतिचार यांच्या टोकाला न जाता कर्म केले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे.

अशाप्रकारे सदाचाराने धर्म, धर्माचरणाने संपत्ति, धर्माशी विरोध येणार नाही अशाप्रकारे विषयोपभोगांची प्राप्ती, नंतर मोक्षप्राप्तीही होऊ शकेल. एका सुभाषितात धनाद्धर्म म्हणजे धनाच्या द्वारा धर्मप्राप्ती होते असे म्हटले आहे. इथे धर्माचरणाने संपत्ति (धर्मेण अर्थं च साधयेत्। कुमार १६) असे त्याच्या उलट म्हटले आहे. परंतु याचा विरोध नाही. संपत्तीमुळे धर्माचरण करता येते व धर्माचरणामुळे संपत्ती प्राप्त होते असे अनुभवास येते. (बीजाङ्कुरवत् अन्योन्याश्रयो न दोषाय।) हे धर्माचरण करीत असतां सत्संग अत्यंत आवश्यक आहे. दुर्जनांच्या सहवासात आपला बुद्धिभेद होण्याची शक्यता जास्त असते. चित्तशुद्धी होईपर्यंत कोणालाही कर्माचा त्याग करून संन्यास घेता येत नाही. स्वतःची योग्यता किती आहे हे प्रत्येकाने स्वतःच जाणले पाहिजे, दुसऱ्याला ती पूर्णांशाने जाणता येत नसते. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्त्वापत्ति, असंसक्ति, पदार्थाभावना व तुर्यगा अशा ज्ञानाच्या सात भूमिका आहेत. त्यातील पहिली भूमिकाही प्राप्त न झालेल्या माणसाचा एकदम वरच्या पायरीवर जाण्याचा प्रयत्न जसा हास्यास्पद आहे, तसेच चित्तशुद्धी न होता कर्मत्याग करणे हे हास्यास्पद आहे. केवळ हास्यास्पद नव्हे तर ते क्लेशदायक ठरेल, असा स्पष्ट इशारा स्वामीमहाराजांनी दिला आहे. आपली योग्यता नसताना संन्यास किंवा अष्टांगयोग यांच्या प्राप्तीची इच्छा करण्यापेक्षा प्रत्येक साधकाने प्रथम अभयादि दैवी-संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न करणे अधिक उपकार ठरणारे आहे.  

 

प्रसंगाने देवतांच्या स्वरूपाविषयी विचार मांडला आहे. मीमांसकांच्या मते देवता म्हणजे मंत्रच, त्यांना स्वतंत्र शरीर नसते. या मताचा स्वीकार न करता स्वामीमहाराजांनी श्रुती व स्मृती यांच्या आधाराने इंद्र-शंकरादि देवतांना विग्रह म्हणजे शरीर असते हे अद्वैतवेदान्तानुसार उत्तर दिले. शरीर असूनही या देवता एकाच वेळी अनेक यज्ञात आहुती घेण्यास योगी पुरुषाप्रमाणे अनेक शरीरे धारण करून जाऊ शकतात व सूक्ष्मरूपाने तेथील हविर्भाग घेतात असा युक्तिवाद महाराजांनी केला आहे. कर्म करण्याकरता देहाच्या ठिकाणी अहंबुद्धि असणे आवश्यक असते आणि ती असेपर्यंत ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही. अशाप्रकारे ज्ञान व कर्म यांच्यामध्ये अत्यंत विरोध असल्यामुळे त्यांचा समुच्चय म्हणजे एकाचवेळी दोहोंचे अस्तित्व संभवत नाही, असे ईशावास्योपनिषद् मंत्रांचा उल्लेख करून त्यांनी प्रतिपादन केले आहे. वेदांची व ईश्वराची अवज्ञा करणे हे नास्तिकपणाचे लक्षण असून असा मनुष्य जिवंत असून मेल्यासारखाच समजावा. तो नरकातच पडेल असे कुमारशिक्षेत स्पष्ट बजावले आहे. उलट ईश्वराचे अस्तित्व मानणारा व वेदोक्त कर्माविषयी आस्था बाळगणारा मोक्षाला जातो असे सांगून केनोपनिषदातील एक आख्यायिका या विवेचनाच्या संदर्भात सांगितली आहे. ती कथा कुमारांच्या प्रमाणेच इतर सर्वांनाही अतिशय मनोवेधक व उद्बोधक अशी वाटणारी असून ती पुढीलप्रमाणे आहे

देव व असूर यांच्यामध्ये एकदा भीषण संग्राम झाला. असुरांचा प्रचंड संहार करून ईश्वराने देवांना जय मिळवून दिला. या जयामुळे देवांची भावना अशी झाली की, आपणच हा विजय मिळवला. परमेश्वराने आपल्याला विजय मिळवून दिला असे त्यांना वाटेनासे झाले. अहंकार हा आत्मविनाशाला कारण होतो, म्हणून देवांना झालेली ही अहंकारबाधा दयाघन प्रभूला पाहवली नाही, त्याने अतिशय मोहक रूप धारण केले व तो त्यांच्यासमोर प्रकट झाला. ते रूप अत्यंत तेजस्वी होते. असे तेज देवांपैकी कोणी यापूर्वी पाहिले नव्हते. म्हणून देवांनी आपल्याकडील अतिशय चतुर असलेल्या अग्निला त्या अपूर्व रूपाला ओळखण्यासाठी त्याच्याकडे पाठविले. त्या तेजाने तू कोण आहेस व तुझ्यात काय सामर्थ्य आहे, हे अग्निला विचारले असता अग्निने सांगितले की, पृथ्वीवरील सर्व पदार्थ जाळून टाकण्याचे आपले सामर्थ्य आहे. त्याची परीक्षा पाहण्यासाठी ईश्वराने त्याच्यापुढे गवत ठेवले व ते त्याला जाळण्यास सांगितले. सर्व शक्ति पणाला लावून अग्निने ते जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो गवत जाळू शकला नाही. अग्नि खजील होऊन देवांकडे परत गेला व हे काही आपल्याला कळू शकत नाही असे त्याने कबूल केले. नंतर देवांनी या कामगिरीवर वायुदेवाला पाठविले. अग्निप्रमाणेच वायुला त्या यक्षरूप धारण केलेल्या ईश्वराने तू कोण? तुझे सामर्थ्य काय? हा प्रश्न विचारला असता वायुने उत्तर दिले की, मी आकाशसंचारी वायु असून पृथ्वीवरील सर्व वस्तु उडवून देण्याचे माझे सामर्थ्य आहे. ते ऐकून ईश्वराने ते गवत त्याच्यापुढे ठेवून उडविण्यास सांगितले. वायु ते उचलूही शकला नाही. लज्जित होऊन हे रूप म्हणजे नक्की काय आहे, हे आपल्याला ओळखता येत नाही अशी कबुली त्याने दिली. नंतर देवांनी इंद्राला ते रूप जाणून घेण्याच्या कामगिरीवर पाठविले. इंद्र येत असतानाच ते रूप अंतर्धान पावले. हजार डोळ्यांच्या इंद्राला सुद्धा ते रूप दिसेना म्हणून तो खिन्न होऊन तिथेच राहिला. तो ईश्वरचिंतन करू लागला. त्याला अकस्मात् अतिशय सुंदर अशा उमादेवीचे दर्शन झाले. अंतराळात उभ्या असलेल्या तिला इंद्राने विचारले की, मी समोर आताच बघितलेले (यक्षरूप) कोणी धारण केले होते? तिने सांगितले,तो सर्वांच्या अंतःकरणात निवास करणारा प्रत्यक्ष परमेश्वरच असून तुमचा अहंकार नाहीसा करण्यासाठी प्रगट झाला होता. इंद्राने सर्व देवांसह ईश्वराची स्तुति केली, अशा रीतीने देवांचा अहंकार नाहीसा झाला. सर्व देवतांना शरीर असते हे या आख्यानाचे तात्पर्य असल्याचे स्वामींनी सांगितले आहे.

या कथेचे आणखीही एक महत्त्वाचे तात्पर्य आपल्या दृष्टीने आहे, ते म्हणजे देवांना सुद्धा अहंकार असतो, नसल्यास केव्हाही उत्पन्न होऊ शकतो. तो वाढल्यास विनाशालाच कारणीभूत होतो. तसा होऊ नये अशी काळजी हृदंतरवासी परमेश्वरच घेत असतो. म्हणूनच आपल्या जीवनात संकटे, अडचणी, अपयश ही उत्पन्न होत असतात. त्यामुळे आपला कर्तृत्वाचा अहंकार नाहीसा होऊन, विपदः सन्तु नः शश्वत्। या कुन्तीदेवीच्या मागणीप्रमाणे परमेश्वराची आराधना आपल्या हातून घडते. धर्मशास्त्र, इतिहास-पुराणे इत्यादि ग्रंथांतून असे प्रतिपादन केले आहे की, ईश्वर हा एकमेवाद्वितीय असा असला, तरी मायेच्या आश्रयाने तो देवी, गणपति, विष्णु, शंकर व सूर्य अशी पाच रूपे भक्तावर अनुग्रह करण्याकरीता धारण करतो. पूर्वी त्याने कश्यपादिकांना वरदान देऊन अवतार घेतला. सध्या कलियुंगातही कृष्णातीरी तो जागृत असल्याची ग्वाही महाराजांनी दिली आहे. भक्तांचा विश्वास दृढ होण्यासाठी स्वामीमहाराजांसारख्यांची आश्वासने उपयोगी पडतात, नव्हे ती आवश्यकच आहेत. कृष्णातीरी जागृत असलेल्या भगवान् दत्तात्रेयांचा अवतार धारण केलेल्या परमेश्वराची एक लीला कुमारशिक्षेच्या शेवटी सांगितली आहे. सर्वांच्या परिचयाची असलेली कथा थोडक्यात अशी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णानदीच्या उत्तरेला शिरोळ नावाचे एक घाव आहे. तेथे श्रीनृसिंहसरस्वतीस्वामीमहाराज भिक्षेकरीता दत्तभक्त अशा दांपत्याच्या घरी गेले. लक्ष्मीपति असूनही संन्यासधर्माचे आचरण कसे असते हे आपल्या आचरणाने इतरांना दाखविण्यासाठीच श्रीगुरु भिक्षा मागण्यासाठी तेथे गेले. यतिधर्माला अनुसरून दंड घेऊन, किडा-मुंगीही मरणार नाही अशा रीतीने पावले टाकीत ते त्या ठिकाणी आले. श्रीगुरुंनी भिक्षा मागितल्यावर ब्राह्मण पत्नीने त्यांचे स्वागत केले. श्रीगुरु हातपाय धुवून आसनावर बसले. त्या साध्वीने महाराजांचे चरणोदक घेतले, त्यांची पूजा केली. आपणासारखे महात्मे देवापेक्षाही श्रेष्ठ असतात, त्यांच्या केवळ दर्शनानेही पापराशींचा नाश होतो. असे म्हणून त्यांची स्तुति केली. तिने अशीही प्रार्थना केली, आपण प्रत्यक्ष विष्णुस्वरूप आहात, आपल्याला भोजन दिल्याने संपूर्ण त्रैलोक्यानेच भोजन केल्यासारखेच होते, तरी माझे पति बाहेर गेले आहेत, ते परत येईपर्यंत आपण थांबावे व भोजन करूनच जावे. ते येण्यापूर्वीच भिक्षा घाल असे म्हणालात तर तसेही करीन. श्रीगुरुंनी तिला सांगितले की, आपण क्षुधापीडित असल्याने ताबडतोब भिक्षा वाढावी. चांगले-वाईट, कमी-जास्त असा विचार मी अन्नाच्या बाबतीत करीत नसतो, कारण मी रसनेन्द्रियावर जय मिळविला आहे. तेव्हा जे असेल ते ताबडतोब वाढ. श्रीगुरुंनी असे म्हणण्याचा हेतु असा होता की, तिच्या पतीची अद्यापि गुरुदर्शनाची योग्यता नव्हती. घरी पत्रावळ नव्हती. पत्रावळीसाठी पाने आणण्यासाठी ती बाहेर जाणार तेवढ्यात श्रीगुरुंनी अंगणातून एक मोठी शिळा आणून जमिनीवर पाण्याचे चौकोनी मंडळ काढून, त्यावर प्रोक्षण करून ती ठेवली. तिच्यावर $कारयुक्त आठ पाकळ्यांचे कमळ काढून भिक्षा वाढण्यास तिला सांगितले. तिनेही त्या पवित्र पात्रात जोंधळ्यांच्या कण्यांची भिक्षा वाढली. पोटभर खाण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य करून यथाशास्त्र भिक्षा केली. विदुराच्या कण्यांप्रमाणे आपण आमच्या कण्या गोड मानून खाल्ल्या. अशी तिने श्रीगुरुंची स्तुती केली. कण्यारूपी हविर्द्रव्याने सर्वात्मस्वरूप असलेल्या भगवंताला संतुष्ट करून अग्निहोत्री ब्राह्मणाला सुद्धा न मिळणारे पुण्य त्या साध्वीने मिळविले. या विधानाचे स्पष्टीकरण करताना स्वामीमहाराज म्हणतात, अग्निहोत्री जे अर्पण करतो, ते तो प्रत्यक्ष परमेश्वराला अर्पण करू शकत नाही, तर अग्नीच्या द्वाराच अर्पण करू शकतो आणि तेही मर्यादितच. इथे तर या साध्वी ब्राह्मणीने साक्षात् परमात्म्यालाच आणि ते ही पोटभर वाढल्याने तिचे पुण्य अग्निहोत्र्याच्या पुण्यापेक्षा अधिकच होय. भगवान् त्या कण्या खाऊन संतुष्ट होऊन तिथून अंतर्धान पावले. श्रीगुरुंनी ब्राह्मण-पत्नीला काही आशीर्वाद दिलाच नाही. प्रत्यक्ष परमात्माच संतुष्ट झाल्यावर निराळ्या आशीर्वादाची आवश्यकताच नसते. तो दत्तभक्त ब्राह्मण नंतर घरी परत आला. त्याला सर्व वृत्तान्त कळला. श्रीगुरुमहाराजांची बोटे उमटलेले ते शिळापात्र पाहून त्याला आनंद झाला. आपल्याला श्रीगुरुंचे दर्शन झाले नाही, त्याबद्दल त्याला खेदही झाला. स्त्रियांना संध्यादि आचार नाही, जपादि अनुष्ठान नाही, परंतु अशा प्रकारचा परमेश्वराचा अनुग्रह त्यांच्यावर होऊ शकतो, हे त्याच्या लक्षात आले. आपल्याला अशी भार्या मिळाल्याबद्दल त्याला धन्यता वाटली. आपल्या पूर्व पुण्याईने घडलेल्या या घटनेमुळे आता आपला भविष्यकाळ उज्ज्वल असल्याची त्याची खात्री झाली. त्या भोजनपात्राची दररोज पूजा करून तो कृतकृत्य झाला. त्याला सर्वविध ऐश्वर्य प्राप्त झाले. या आख्यायिकेचा मुख्य भावार्थ असा आहे की, अतिथी कसाही असला तरी त्याचा सत्कार करावा, अवमान करू नय. आणखी एक सूचित अर्थ या कथेतून कळतो, तो सांप्रत अधिक उपयोगाचा आहे. पुरुषांनी करावयाची सर्व अनुष्ठाने स्त्रियांनी करण्यास काय हरकत आहे?’ या शंकेचे उत्तर मिळते.

पुरुषाच्या बरोबरीने सर्व काम करण्याचा हक्क व योग्यता असलेल्या सध्याच्या काळात अमुक एखादे अनुष्ठान किंवा ग्रंथवाचन स्त्रियांनी करू नये असे म्हटल्यावर त्यात स्त्रियांच्या बाबतीत अनुदार दृष्टिकोनाचा वास लोकांना येत असतो. वस्तुतः तसे म्हणणे, तशी विचारसरणी मुळीच नाही. स्त्रीच्या उत्कर्षाचा विचार कधीही डोळ्याआड केला गेला नाही. प्रस्तुतच्या कथेवरूनही हेच स्पष्ट दिसून येते की, सर्व काही करण्याचा हक्क किंवा अधिकार असलेल्या ब्राह्मणाला जे भगवद्दर्शन झाले नाही ते वेदाध्ययनाचा अधिकार नसलेल्या त्याच्या पत्नीला झाले. अतीन्द्रिय ज्ञान असलेल्या महर्षींनी घालून दिलेले नियम केवळ लौकिक व्यवहाराच्या फूटपट्टीने मोजून चालणार नाहीत. त्यातून अन्तिम हित होऊ शकणार नाही. उलट अकल्याण होण्याचीच शक्यता अधिक असते. अशा प्रकारे कुमारांना अल्पखाद्याप्रमाणे असलेली ही कुमारशिक्षा प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीमहाराजांनी कार्तिक स्वामींच्या पर्वतावर असताना, शास्त्रसिद्धान्तांचे अध्ययन न केलेल्या साधकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लिहिली.

शिक्षात्रयम्

युवशिक्षा परिचय

वृद्धशिक्षा परिचय

 
 
 
Top