श्रीगुरुवामनस्मरणी
पिढ्यान् पिढ्यांच्या पुण्याईने सिंचन केलेल्या, पावन वासिष्ठ गोत्रीय गुळवणी वंशाच्या दत्तभक्तीच्या क्षेत्रांत, तपउज्ज्वल उमामातेच्या उदरीं अवतरून त्रैलोक्य सुखावणारे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
बाल्यावस्थेपासूनच वाडीच्या नरसोबाचा वेध लागलेले, अखंड दत्तचिंतनांत रमणारे, आणि वासुदेवयतींच्या चरणीं स्थिरावलेले ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
व्रतबंधाने सिद्ध झालेल्या द्विजत्वाला जोपासणारे, वैदिक संस्कृतीचा वारसा निजजीवनांत प्रकाशणारे, अखिल सनातनधर्मीयांना आदर्शभूत असे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
गुरुचरित्रपठणांत निमग्न झालेले, दत्तनामांत रंगुन गेलेलें, सदैव गुरुचरणसेवनांत रमलेले ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
गुरुदर्शनाच्या उत्कट ओढीने तहानभूक विसरणारे, ऊन-पाऊस-वाऱ्यालाही न जुमानणारे, एवढेच काय प्राणांचीही पर्वा न करणारे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
हावनूरला गुरुदर्शनाने सुखावलेले, गुरुसंगाने आणि गुरुसेवेने धन्यत्व पावलेले, गीतासहस्रनामाच्या उपदेशाने तृप्ततृप्त असे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
वासुदेवानंदाना प्रिय झालेले, त्यांच्या कृपेत मनसोक्त न्हायलेले, त्यांच्यांतील निगूढ दत्तस्वरूपाचा वेध घेणारे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
स्वतःच्या विवाहाला उद्युक्त मातेला, कुंडलीचा आधार दाखवून परावृत्त करून श्रीपादश्रीवल्लभांशी ऐक्य प्रकट करणारे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
औदुंबरक्षेत्री दत्तमालामंत्राचे अनुष्ठआन करणारे, पवनाकांठईं गुरूपदेशाने तेजाळलेले, गरुडेश्वरीं भुक्तिसुप्तींचा विसर पडलेले, षट्-क्रिया, आसने प्राणायाम यांपासून खेचरी व योनिमुद्रेपर्यंत हठयोग सिद्ध करून, जिज्ञासूंना मार्गदर्शन करणारे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
सद्गुरूंनी संकेत केलेल्या कुंडलिनीजाग्रतीसाठी जिवाचे रान करणारे, जगदंबेच्या आदेशाने दक्षिणेला आलेल्या चिन्मयानंदांना पारखणारे, त्यांची योग्याता पटतांच सद्गुरुनाथांच्या आज्ञेने, त्यांच्याकडून शक्तिपातविद्या ग्रहण करणारे आणि त्या विद्येचा त्रैलोक्यांत प्रसार करणारे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
सद्गुरु वासुदेवानंदांच्या वाङ्मयमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे, श्रीवासुदेवानंदसरस्वती आणि श्रीलोकनाथतीर्थ या उभय सद्गुरूंचे मंदिर उभारून मुळामुठासंगमावर एका अभिनव शक्तिपीठाची स्थापना करणारे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
संन्याशांना लाजविणारे वैराग्य, प्रगाढ पंडितांना मुग्ध करणारे आत्मज्ञान, दया, क्षमा, शांति, शुचिता, आचार्योपासन, आर्जव, आतिथ्य अशा अगण्य गुणरत्नांना आपल्या शालीनतेच्या कोंदणाने भूषविणारे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
शब्दांत काय कल्पनेतही न येणारे, तथापि स्मरणमात्रे भक्तहृदयांत प्रकटणारे, सहस्रावधि जीवनांचा आश्रय होऊन, सहस्राधिक मास भूतलावर नांदलेले व अंती आपल्या मूळ स्वरूपांत लीन होऊनही धर्मसंस्थापन, भक्तरक्षण व दुष्टशासनाचे कार्य अविरत चालूंच ठेवणारे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
दैवी संपत्तीची गोष्टच सोडा, लौकिकांतील नारळाचेही दातृत्व नसलेल्या वासुदेवावर अहैतुकी कृपेचा वर्षाव करून कृतार्थ करणारे ते मंद मधुर स्मित हास्य निरंतर माझ्या हृदयीं विलसो.
वासुदेव